Wednesday, 25 March 2020

Kuch Corona


कुछ करोना
दिनांक 20 मार्च ची प्रसन्न सकाळ. वेळ सकाळी साडेनऊ वाजता. सकाळची उन्हे केव्हाच तापायला लागली होती. मी मुंबई पासून 120 नॉटिकल मैल लांब खोल समुद्रात आमच्या जहाजाच्या कंट्रोलिंग ब्रिजच्या सीटवर बसून  अथांग निळा समुद्र बघत होतो. मनात सर्व शिप ट्रायल्स यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल एक प्रकारचे समाधान होते, परंतु त्याच बरोबर घरी जायची ओढ लागली होती. पंधरा दिवसांच्या खडतर 'सी' ट्रायल नंतर शारीरिक व मानसिक थकवा आला होता. 'प्रोजेक्ट इन्चार्ज' म्हणून मोठी जबाबदारी होती , परंतु ईश्वर कृपेने सर्व सुरळीत पार पडले. तरी घरी पोहोचायला अजून दोन दिवस बाकी होते म्हणून मनात एक प्रकारची अस्वस्थता होती. सभोवतालचा  निळाशार संथ समुद्र जणु  मला त्याच्या प्रमाणे शांत रहायला सांगत होता.
इतक्यात आमच्या शिप चे कफ्तान , कॅप्टन भसिन यांनी माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले "टेन्शन मे क्यु है भाई  ? एन्जॉय ! वुई हॅव अचिव्हड ट्रायल शेड्युल सक्सेसफुली." मी म्हणालो, " अजून मुंबई शोअरला जायला दोन दिवस बाकी आहेत म्हणून कंटाळा आला आहे. येथे भर समुद्रात आल्यावर नॅव्हिगेशन सिग्नलशिवाय बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. बायको, मुली व जावई यांच्या आठवणीने मन गलबलले आहे ". कॅप्टन भसिन म्हणाले " कमॉन यार , लेट अस हॅव नाईस टी ",असे म्हणून त्यांनी स्टुअर्टला बोलावून २ चहा मागविले. नक्षीदार कपात चहा आल्यावर भासिनने चीअर्स म्हणत चहाचा घोट घेतला. मी पण त्या पांचट ग्रीन टी चा घोट घेतला. मग भसिनच्या हरियाणामधील निर्बुद्ध गावगप्पा सुरू झाल्या. केवळ नाईलाजाने मी मान डोलवत होतो.
इतक्यात कर्णकर्कश्श सॅटेलाइट फोनची रिंग वाजली. भसिनने पुढे सरसावत फोन घेतला.  "ओके.. ओके..  या..  या,  नो प्रॉब्लेम , वुई विल बी देअर... रॉजर ".  माझ्या  मनातली उत्कंठा वाढली. फोन चा रिसीव्हर आदळत भसिन म्हणाले " कमॉन गाईज, प्रिपेअर फॉर शोअर मुव्हमेंट ". त्याना  फक्त मेसेज आला की " ड्यू टू लोकल डिस्टर्बनसेस, कम बॅक इमीडिएटली." हे ऐकून मनात एकदम धस्स धस्सं झाले. मुंबईत काय प्रॉब्लेम असेल ? जातीय दंगली... आरक्षण चळवळ...  भूकंप... असे नाना विचार मनात येऊ लागले.
कॅप्टन भसिनने नेव्हिगेशन ऑफिसरला बोलावून घोषणा केली की, आपला सेलिंग प्रोग्रॅम चेंज झाला आहे आणि आपण उद्या सकाळीच मुंबईत पोहोचत आहोत. सर्वांनी एकदम जल्लोष केला ,परंतु कोणाला लोकल डिस्टर्बनसेसची कल्पना दिली नाही आणि मला पण कोणास न सांगावयाचे बजावले. माझ्या मनातील घालमेल आणखीन वाढली. काय झाले असेल घरी ? सर्व ठीक असेल ना ? इतर सर्व सहकारी मात्र आनंदात होते. तो दिवस मी रिपोर्ट बनविण्याच्या कामात व्यग्र करून घेत वेळ काढत होतो. सतत ऑटोपायलट कडे जाऊन,  मुंबई अजून किती दूर आहे ते चेक करत होतो. 120... 115... 90...  80... नॉटिकल माईल्स. रात्र केबिनमध्ये अर्धवट झोपेत काढली व सकाळी सहा वाजता उगवता सूर्य बघण्याकरता मेन डेक वर आलो. तेथे तुरळक लोकं होती. इतक्यात मोहक तेजोमय लाल गोळा समुद्रातून उदय झाला. नवीन  दिवस...  नवीन पहाट... आज मुंबईत गेल्यावर काय बघायला लागणार ह्याची मनात घालमेल होती.
कॅप्टन भसिनने सकाळी साडेनऊ वाजता एंटेरिंग हार्बरची घोषणा केली. मी सर्व सामान घेऊन केव्हाच लॉबीत दाखल झालो होतो. घरी जायच्या उत्सुकतेने खडतर प्रवासाचा क्षीण केव्हाच गेला होता. मुंबई पोर्टला पोहोचल्यावर घरी फोन न करताच जाऊन घरच्यांना सरप्राईज देण्याचे ठरविले आणि तसाही माझा मोबाईल पण पुर्ण डिस्चार्ज झाला होता. त्यामुळे प्रश्नच नव्हता.
बरोबर दहा वीस ला आमची शिप मुंबई डॉक मध्ये धक्क्याला लागली. पंधरा दिवसांनी झालेले भूमीचे  दर्शन सुखावले. गॅंग वे लागला आणि सर्व कर्मचारी भराभर खाली उतरले व बसमध्ये बसले. मी पण कॅप्टन भसिनबरोबर क्लोजिंग मीटिंग करून, निरोप घेऊन, निघालो. गॅंग वे वरून लगबग ऊतरून माझ्या गाडी कडे गेलो. बघतो तर काय ! माझा ड्रायव्हर अरुण हातात मोजे ,टोपी, तोंडाला सर्जिकल मास्क घालून उभा होता. माझ्या हातातील बॅग डिकीत टाकुन म्हणाला "चलो जल्दी साब." काही उमजायच्या आत मी पटकन गाडीत बसलो. काय झाले हेही कळत नव्हते. मी म्हणालो "अरे अरुण, क्या बात है ?सब ठीक है ना ? ". अरुण म्हणाला " अरे साब, कुछ मत पूछो, ये, चायनीज व्हायरसने सबका जीना हराम कर दिया है. पुरी मुंबई बंद हो गई है.  सब ट्रॅफिक बंद है. अपना गाडी का स्पेशल पास है , इसलिये मै आ सका. अभी आप घर जाके आराम करो. सब ऑफिस बंद है."
मला क्षणभर उमजेना की काय चालले आहे. नेहमी गजबजलेला मुंबई डॉक सुनसान होता. आमची गाडी बाहेर पडली. पुढे रिझर्व बँक, हॉर्निमन सर्कल , व्ही.टी. स्टेशन ; सर्व भाग चिडीचूप होता. मुंबई बंदच्या काळात पण एवढी भयानक शांतता नव्हती. नाक्यानाक्यावर पोलीस लाठ्या घेऊन लोकांना हाकलवत होते. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे विमानतळाच्या धावपट्टी प्रमाणे मोकळा दिसत होता. मन विषण्ण झाले व प्रचंड कालवाकालव झाली.
अखेर आमच्या कॉलनीच्या गेट वर पोहोचलो. बघतो तर काय ! आज पर्यंत कधीही बंद न पाहिलेले आमचे मेन गेट बंद होते. मी खाली उतरलो व अरुणने बॅग काढली आणि “अच्छा साहब मै जाता हूँ , खयाल रखना”, असे म्हणून तो निघून गेला. मी गेटपाशी गेलो तेव्हा आमच्या सोसायटीतले परळकर , रेड्डी,  गांधी वगैरे इतर सदस्य तोंडावर मास्क घालून उभे होते. “अरे शिधोरे साब आ गये. आओ ..आओ , लेकिन किधर भी छुने बगैर अपने क्लब हाऊस के बाथरूम मे जाकर नहा लो. हम भाभी को आपके कपडे लेके बुलाते है.” मला काय होत आहे हे कळतच नव्हते. नेहमी अदबीने , आदराने बोलणारे माझे शेजारी एकदम कडक आवाजात बोलत होते. मी पण एखाद्या अपराध्याप्रमाणे गुपचूप क्लब हाउस मध्ये गेलो. लगेच माझी बायको व मुलगी धावत आले. “अरे वा ! तुम्ही लवकर आलात  ? सगळं ठीक आहे ना ? सर्दी, खोकला, घसा दुखी नाही ना ? ताप नाही ना ?” अशी प्रश्नांची सरबत्ती केली. मी ऊचकलो " अगं  ए , मला काय धाड भरली आहे ? काय चाललंय  काय ? स्टुपिड नॉनसेन्स..." “आणि आता जास्त बोलू नकोस. पटकन आंघोळ करून ये. कपडे आत ठेवत आहे पण त्यांना आंघोळ झाल्याशिवाय स्पर्श सुद्धा करू नकोस.” मी एखाद्या फ्युनरलला जाऊन आल्यावर आंघोळ करतात त्याप्रमाणे आंघोळीला गेलो. आंघोळ करून, शुचिर्भूत होऊन बाहेर आलो, तेव्हा मगाशी कडक बोलणाऱ्या शेजाऱ्यांनी प्रेमाने स्वागत केले. “अरे साब इधर कोरोना ने हॅवॉक किया है. बम्बई से लेकर पुरे देश मे दिन ब दिन पॉझिटिव्ह केसेस बढ रहे है , इसलिये गव्हर्नमेन्टने कर्फ्यू लगाया है.” एवढ्यात , "अरे चल सगळे जेवायला थांबले आहेत " असे म्हणून बायकोने मला खेचले व त्यांच्यापासून सुटका केली. घरी आल्यावर हायसे वाटले. घरात भाऊ, वहिनी आणि पुतण्या सगळे स्वागताला उभे होते. एखादी स्वारी जिंकून आल्याप्रमाणे माझ्याकडे बघत होते. मी हुश्श करून प्रथम देवाला आणि आई-बाबांच्या फोटोला नमस्कार केला. नंतर घरच्या मधुर चहाचा आणि खारी बिस्किटांचा खूप दिवसांनी आस्वाद घेतला. तेव्हा भावाने सविस्तर माहिती सांगितली. मी जेव्हा पंधरा दिवसांपुर्वी गेलो तेव्हा भारतात कोरोनाचा नामोनिशाण नव्हता. फक्त चायना ,इराण ,इटलीच्या धडकी भरणाऱ्या बातम्या येत होत्या.
बायकोने लगेच होळीपौर्णिमा मिस झाली म्हणून ठेवलेल्या पुरणाच्या पोळ्या केल्या. पुरण पोळ्यांवर ताव मारून जरा वामकुक्षी घेतली. जाग आली तर टीव्हीवर समोर आपले माननीय मुख्यमंत्री जनतेला आवाहन करत होते व त्यांनी जाहीर केले की जमावबंदी करून सुद्धा लोकांची ये-जा बंद न झाल्यामुळे नाईलाजाने संचारबंदी जाहीर करावी लागत आहे.
एवढ्यात आमच्या सौ बरसल्या " ए लवकर चल , आपण बाजारात जाऊन घरी भाजीपाला, किराणा घेऊन येऊ. " मी संचार बंदीचे कारण देऊन विरोध केला पण अपयश आले. शेवटी गाडी काढून निघालो. सौं नी भली मोठी यादी बरोबर घेतली होती. सर्वात आधी तीन-चार एटीएम वर निराशा झाल्यावरएका एटीएम मध्ये जेथे नेहमी कॅश नसते, तेथे कॅश मिळाली. म्हणजे साधारणपणे शाळेत नेहमी दांडी मारणारी मुले बंद, संपाच्या दिवशी हमखास येतात त्याप्रमाणे.
आम्ही नंतर आमच्या नेहमीच्या किराणा दुकानाकडे कूच केले. तेथे भली मोठी रांग होती. पण गंमत म्हणजे रांगेत लोकं एकमेकांपासून तीन फूट अंतर सोडून उभे होते. धन्य आहेत ते नागरिक ! त्यामुळे सहसा बेशिस्त वागणाऱ्या लोकांचे हे वर्तन पाहून मला गहिवरुन आले. दुकानदाराला यादी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी रांग मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्वजण, माझ्यावर एका गल्लीत आलेल्या अनोळखी माणसावर कुत्रे जसे भुंकतात तसे ओरडू  लागले. शेवटी मलाच लाज वाटली आणि लोकांची माफी मागून बायकोने काढता पाय घ्यायचे ठरवले. अखेर एका छोट्या खोपट वजा गिऱ्हाईकाची वाट बघणाऱ्या  दुकानात गेलो. तेथे नापसंती ने का होईना, बायकोच्या शिव्या खात किराणा खरेदी केला. तोपर्यंत रस्त्यावर संचारबंदी चा परिणाम दिसू लागला होता. पोलिसांच्या लाठ्या चुकविण्या करिता दुचाकीस्वार केविलवाणी धडपड करत होते. रस्त्यावर एकही भाजी विकणारा भैया दिसेना, तेव्हा चिंतेत पडलो व मनात विचार आला कि सर्व भय्ये घाबरून युपीमध्ये गेले कि काय ?
परंतु चाणाक्ष सौं नी हे जाणून मला गाडी त्यांच्या ब्युटीपार्लर जवळ घ्यायला सांगितले. मी म्हणालो "काय वेड लागलं आहे का ? प्रसंग काय ? तू जातेस कुठे ?ही वेळ आहे का ? " तेव्हा शांतपणे "तू चल तर आधी असे सुनावले ". आधीच्या दुकानात लोकांकडून अपमान झाल्यामुळे मी बायकोचे न वाद घालता ऐकायचे ठरविले . ब्युटी पार्लर समोर गाडी थांबवताच, ती "तू येथेच थांब " असे म्हणून पिशव्या घेऊन ब्युटीपार्लर च्या दिशेने गेली. मी मनांत म्हटले की ह्या ब्युटी पार्लर च्या बाईने भाजीचा मळा घेतलाय की काय ? आजकाल काही सांगता येत नाही. जसे आमचे गुरुजी फावल्या वेळात भांडी व रबर स्टॅम्प विकतात! थोड्यावेळाने विजयी मुद्रेने आमच्या सौ भरपूर पिशव्या भरून भाजी घेऊन आल्या तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे कुतूहल बघून मी काही विचारण्या आधीच ती म्हणाली " येथे गॅरेजच्या मागे भाजीवाले असतात. जेव्हा म्युनिसिपालटीवाले त्यांना हाकलतात , तेव्हा ते येथे लपून बसतात " . मला बायकोची धन्य वाटली. मी पार्ल्यामध्ये पंचावन्न वर्षे राहून सुद्धा मला माहित नसलेल्या जागा आमच्या सौं नी गनिमी काव्याने हुडकून काढल्या.
परत एकदा हुश्श वाटले. मग सौं नी केमिस्टच्या दुकानावर चढाईचा बेत आखला. परंतु मी अत्यावश्यक औषधांचा घरात भरपूर साठा आहे व संचारबंदीत औषधे केव्हाही मिळतील या सबबी देऊन तो बेत हाणून पाडला. आता माझी खरेदी शक्ती संपली होती म्हणून आम्ही घराकडे परतायचे ठरविले .
तरी सौं नी वाटेत पटकन गाडी थांबवून एका ठिकाणाहून देवा करता फुले घेतलीच. मी तिला दंडवत घालून घरी यायला निघालो तर काय…… सुमारे शंभर मीटरवर पोलीस  रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. मी म्हटले “आता आपली काही  खैर नाही.”  परत जाणे शक्य नव्हते.  शेवटी एक उपाय सुचला. बायकोला आजारी असल्याचे सोंग घ्यायला सांगितले व गाडी पुढे दामटली. अपेक्षेप्रमाणे पोलिसांनी गाडी थांबवलीच .
आपल्या करडया भेसुर आवाजात विचारले "कुठे चालले आहात ? तुम्ही सुशिक्षित माणसे, संचारबंदी चालू आहे हे कळत नाही का ? कलम 188 लावू का ? " मी हात जोडून म्हणालो " अहो साहेब, हिला बरे नाही आहे, तीला डॉक्टर कडे घेऊन चाललो आहे '. तेव्हा पोलिसांनी बायकोला विचारले " काय ताई ? काय होतंय ? " आमच्या सौ काय कारण सांगायचे हे ऐकून गडबडल्या व म्हणाल्या की “ताप आहे ". तेव्हा पोलिसाने लगेच आपला खाली ओघळलेला मास्क तोंडावर चढवत म्हणाला " बापरे कोरोना की काय ? " सौ अधिक नर्वस झाली. मी म्हणालो "नाही हो, साधा ताप होता , आता बरा आहे " . तेव्हड्यात दुसऱ्या पोलिसाने आत डोकावत केलेली भली मोठी खरेदी बघीतली आणि म्हणाला "वाटलंच लई खरेदीचा ताप आलाय होय ". मी हसत हसत पोलिसाला डोळा मारला. सुदैवाने त्या पोलिसाला पाझर फुटला व म्हणाला " जा.. जा.. काय तुम्ही ?  परत बाहेर पडू नका”. त्यातून सुटका झाल्यावरआग्र्याहून सुटका झाल्याच्या अविर्भावात घरी धूम ठोकली. असे हे आमचे संचारबंदी प्रवास पुराण.....
... खरं पाहता आपण सर्वांनीच हे खरोखरच खुप सीरियसली घेण्याची जरुरी आहे याची जाणीव झाली. सरकार आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आपण पण त्याला घरी राहून प्रतिसाद द्यायला हवा कारण कोरोनावर अद्याप औषध नसल्यामुळे 'Self Quarantine is best medicine’ हे जाणून आपण सर्व जण घरीच राहूया व ह्या व्हायरसला लवकरात लवकर पिटाळून लावूया ह्याचा निर्धार करूया.
शिरीष शिधोरे
सोमवार , २३ मार्च २०२०
( हे कथापुराण काल्पनिक आहे )

11 comments:

  1. सरदारांचा विजय असो. आपल्यात दडलेले लेखक माहीत नव्हते.
    सर म्हणतात त्या प्रमाणे लिहित रहा सातत्याने 🙏🙏👍👍

    ReplyDelete
  2. प्रबोध मेहेंदळे

    ReplyDelete
    Replies
    1. सरदारांचा विजय असो. आपल्यात दडलेले लेखक माहीत नव्हते.
      सर म्हणतात त्या प्रमाणे लिहित रहा सातत्याने 🙏🙏👍👍

      Reply

      Delete
  3. Superb shirish ...👍👍👍

    ReplyDelete
  4. Loved reading it Shirish.
    Excellent stuff


    ReplyDelete
  5. Very aptly described. Really nicely written.

    ReplyDelete
  6. Shirish, Being a seafarer (& also sailed with Ex. Indian Navy Submarine Commanders), I immensely enjoyed your article. Though you have said, its fiction, all the details are accurate & emotions are very well captured. Do keep writing. Will follow your Blog regularly. Bravo, once again.
    Regards
    Shrikant Phansalkar

    ReplyDelete