पाहुणे
बऱ्याचं दिवसांनी एकदा ऑफिसला दांडी मारण्याची इच्छा झाली म्हणून एका बुधवारी सुट्टी घेतली. आजूबाजूचे सर्व लोक कामाच्या लगबगीत आहेत व आपण तंगड्या पसरून बसलो आहे हे अत्युच्च आनंदाचे क्षण असतात. दिवसभर पडून राहण्याचा बेत केला. सकाळी चहा,नाश्ता झाला. तेव्हा बायको तिच्या ऑफिसला जायच्या कामात बिझी होती. मी आपला टंगळमंगळ करत बाहेरच्या गॅलरीत उभा होतो.एवढ्यात एक कावळा आमच्या खिडकीवर बसून काव-काव करु लागला. सुरुवातीला माझे लक्ष गेले नाही पण मग आतून बायको ओरडली "अरे कावळा का ओरडतोय ? कोणी पाहुणे येणार वाटतं ! त्याला पोळीचा तुकडा घाल ". मी तिरस्काराने त्या कावळ्याकडे बघितले आणि म्हणालो "अगं तू कोणत्या जगात वावरत आहेस ? कावळ्याचा आणि आपल्या पाहुण्यांचा काय संबंध ? असलाच तर आपल्या पितरांशीआहे. आणि आता हा बघ, आणखीन एक कावळा येऊन बसला. म्हणजे दोन पाहुणे येणार का ?" त्यावर बायको म्हणाली "मला अत्ता तुझ्याशी ह्या विषयावर हुज्जत घालायला अजिबात वेळ नाही आहे. तुला काय करायचे ते कर". असे म्हणून ती निघून गेली. तिने धाडकन दार लावून घेत ऑफिस कडे प्रयाण केले.
का कोण जाणे !, मला त्या कावळ्यांची दया आली आणि बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी आतून पोळीचे तुकडे आणून कावळ्यांना घातले. ते खाऊन कावळे पळून गेले परंतु माझ्या मनातून कावळा व पाहुणे हे दोन विषय जात नव्हते. मी आरामखुर्चीत विसावलो आणि मनांत विचार आला की खरंच दारावरचा कावळा आणि पाहुणे यांचा संबंध आहे का ? त्या कावळ्यांना आपल्या घरात येणारे पाहुणे माहीत असतात का ? म्हणून ते पाहुणे आपल्या गावाच्या वेशीवर आल्यावर,आपल्याला खिडकीवर बसून ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन देतात. का त्यांना टेलीपथी होते ? एवढ्या माणसांच्या गराड्यात हे असे प्रत्येक घराचे पाहुणे कावळे कसे काय ओळखतात ? जर आज आमची खिडकी बंद असली तर ते शेजारच्या खिडकीवर बसले असते का ? मग पाहुणे पण शेजारी ट्रान्सफर झाले असते का ? जर आपण त्यांना हाकलून दिले असते तर येणाऱ्या पाहुण्यांनी काय आपला बेत रद्द केला असता का ? अथवा त्यांना पोळी दिल्या मुळे येणाऱे पाहुणे आपल्याला काही भेट वस्तू आणतील का ? खरंतर आपल्या पुराणाप्रमाणे कावळे हे आपल्या स्वर्गवासी पितरांचे प्रतीक आहेत. मृत व्यक्तीच्या दहाव्या दिवशी ते पिंडाला चोच मारून आपला हक्क राखून ठेवतात. मग हे आपलेच पितर आपलेच पाहुणे म्हणून येतात की काय ? काही ठिकाणी रोज कावळे येऊन खाणे वसूल करतात मग त्या घरात रोज पाहुणे येतात की त्यांचे पितर रोज त्यांचा संसार कसा चालला आहे हे चेक करायला येतात ? एक ना दोन, अशा असंख्य काक प्रश्नांनी माझे डोके चढले व मी या काक पुराणाचा विचार सोडला.
तरी पाहुणे हा विचार काही केल्या मनातून जात नव्हता. आता मला सांगा, पाहुणे म्हणजे नक्की कोण ? मराठी भाषेत याचा खूप व्यापक सर्वसमावेशक अर्थ आहे. पण पाहुणे या शब्दाची व्याख्या मात्र कोणत्या शब्दकोशात सापडत नाही. पाहुणे म्हणजे जर परस्थ किंवा परके किंवा आपल्या घरात न राहणारे अशी व्याख्या केली, तर आपले लग्न झाल्यानंतर आपण वेगळे राहायला लागल्यामुळे ,विभक्त झालेले आपलेच भाऊ, बहीण, आई, वडील ह्यांचे काय ? त्यांचं तर आपल्याशी रक्ताचंच नातं, मग ते पाहुणे कसे ? आपले चुलत,आते, मावस, मामे भाऊ असतील तर ते आपले पाहुणे म्हणायचे का ? मग ते आपल्याकडे आल्यावर आपण त्यांच्याशी परकेपणा ने वागतो का?
आपले जवळचे मित्र मंडळ, ऑफिसमधले सहकारी, सोसायटी मधील लोक, महिला मंडळ, भिशी ग्रुप, संगीत महफिल ग्रुप, अभ्यास मंडळं ,आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींचे पालक, भजनी मंडळं ,कलाशिक्षक, ट्यूशन टीचर, वगैरे... वगैरे ... सर्व परस्थ लोक आपल्या घरी येतात मग ते आपले पाहुणे का ? की आणखीन कोणी?
बरं त्यातले पण काहीजण आपल्याकडे फक्त थोड्या वेळा करता म्हणजे एखाद्या सकाळी किंवा संध्याकाळी येतात. परंतु काही लोक दोन-तीन दिवस राहण्याकरता येतात , मुंबई बघायला येतात , कधी परदेशी जाण्याकरता विमानतळावर सोडायला येणारे नातेवाईक असतात , काही जण औषध उपचाराकरता आलेले असतात , तर काही जण एखाद्या ट्रेनिंग कोर्स साठी किंवा कामानिमित्त येतात, ते कोण म्हणायचे ?
आपल्याकडे काही लोकांत जावई, मेहुणे, व्याही ह्यांना पण 'आमचे पाहुणे' म्हणून संबोधतात, तेव्हा मात्र कन्फ्युजन होते. मग त्यांच्या घरात वर नमूद केलेले कुणी आले तर ते पण पाहुणे आहेत का ?
आपल्याकडे कोणत्याही समारंभात ,शाळेत, महाविद्यालयात ,गणेश मंडळात, सार्वजनिक उत्सवात, जत्रेमध्ये ,प्रदर्शनात जर एखाद्या, त्यांच्या मानाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती ला बोलावले तर ते प्रमुख पाहुणे होतात. तेव्हा अशा समारंभात जर "ते प्रमुख पाहुणे" असतील तर मग साधे पाहुणे कोण ?
बऱ्याच वेळा मंडळातील नेतेमंडळी आपली पत वाढवण्याकरता पाहुणे बोलावतात तेव्हा ते जास्त लक्ष पाहुण्यापेक्षा आपल्याकडे कसे दिले जाईल याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात.
आपल्याकडे काही वेळा चित्रपटात "पाहुणे कलाकार" असतात. आता हे नेमके कोण ? पैसे न घेता फुकट काम करणारे, का आपला रेट निर्मात्याला परवडत नाही म्हणून आपला छोटा रोल घेऊन तेवढेच पैसे घेणारे कुणी मोठे कलाकार ! मला तर वाटतं एखाद वेळेस जर दोन सिनेमांचे शुटिंग एकाच ठिकाणी बाजू बाजूला चालू असेल तर उगीचंच आपलं दुसऱ्या सिनेमात फक्त डोकावणे किंवा सुभाष घई, रोहित शेट्टी ह्यांच्या सारखं नुसतं ओझरते दर्शन देणे म्हणजे पण पाहुणे कलाकार का ? मला तर वाटतं की काही वेळा केवळ या पाहुण्या कलाकारांमुळेच सिनेमा चालतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले " बिग बी ". अहो नुसतं त्यांचं दर्शन जरी सिनेमात झालं, ओझरतं का होईना तरी सिनेमा सो कॉल्ड बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होतो.
आपण सर्वजण ईश्वराला मानतो. त्याची पूजा करतो. मग गणेशोत्सवात जेव्हा गणपतीबरोबरच गौरी ही बसवतात तेव्हा गौरीला आपण पाहुणे का म्हणतो ?
हा मला न उलगडलेला आणखीन एक प्रश्न. जर देवाला आपण आपलंच मानलं तर मग त्याला आपण पाहुणा कसं केलं ?
आणि हो आणखीन एक ,आपल्या भारतामध्ये येणारे विदेशी पाहुणे राहिलेत की. सर्वात पहिला विदेशी पाहुणा म्हणजे नवव्या शतकात आलेला चिनी यात्रेकरू युआन साॅंग त्यानंतर कोलंबस वगैरे.. वगैरे ... पण आले.
बाबर व मोगलांनी चढाया केल्या पण ते काही पाहुणे नव्हते. खरे पाहुणे म्हणून आले ते इंग्रज. आपल्याच देशात येऊन मसाल्याच्या व्यापाराच्या नावाखाली आपला देशच काबीज केला आणि दीडशे वर्षे राज्य केले. हे म्हणजे "भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी" हि म्हण इंग्रजांनी शतशः खरी केली, त्यामुळे इंग्रजांचा आपल्या देशाला पडलेला हा सगळ्यात महाग पाहुणचार आहे.
काही वेळा आपल्या शेजाऱ्यांकडे आलेल्या पाहुण्यांशीही आपली मैत्री होते. अहो अशाच शेजाऱ्यांच्या पाहुण्यांशी झालेल्या मैत्रीतूनच अनेक प्रेमविवाह झालेले आहेत हे हि नवलचं !
सगळेच पाहुणे म्हणजे काही फक्त माणसंच नसतात. आपल्या घरी पाळलेल्या किंवा आपल्या भागात येणाऱ्या पशुपक्ष्यांना पण आपण पाहुणेच म्हणतो. अहो पण आपल्या घरी नकळत येणारे उंदीर, बेडूक, पाली असे पाहुणे आले तर मात्र आपली दाणादाण उडते.
काही स्थलांतरित फ्लेमिंगोंसारखे पक्षी वर्षातले काही महिने आपल्या इथे पाहुणे म्हणून येतात आणि सुखावह सहवास देऊन जातात, परंतु त्याच बरोबर जंगलातून शहरी वस्तीत शिरणारे बिबटे वाघ हे मात्र जीवघेणे पाहुणे ठरतात.
गुन्हेगारी उद्देशाने घरी येणाऱ्या पाहुण्यांचा प्रत्यय फक्त चित्रपटात किंवा एखाद्या टीव्ही सिरीयल मध्ये बघायला मिळतो पण त्याचबरोबर एखाद्या भक्ताला मदत करायला देवही रूप बदलून पाहुणा म्हणून येतो अशीही काही जणांची ठाम समजुत आहे.
पार गोंधळून गेलो आहे ! पाहुणे म्हणजे नक्की कोण ? हे समजायचा खुप प्रयत्न केला परंतु ठोस उत्तर काही मिळालं नाही म्हणून उद्विग्न झालो.
एवढ्यात बायकोचा मोबाईलवर कॉल आला. "अहो काय करताय ? आंघोळ, जेवण झाले का ? बरं, मी आता अशा करता फोन केला, की तुम्हाला माझी सांगलीची आत्तेबहीण पमी ऐकून माहिती आहे ना, तिच्या दिराचे साडू व त्याचे कुटुंब मुंबईला आले आहेत. त्यांना तीन वाजता सर्कसचा शो बघायला जायचे आहे.तेव्हा दोन तास ते आपल्या घरी टाईमपास करायला येत आहेत तरी त्यांची खातरदारी करा. त्यांना चहा पाणी द्या, बाहेरुन काहीतरी सामोसे वगैरे पण मागवा हं ,नाहीतर पमी रागवेल. बरं आता मी फोन ठेवते. कामांमध्ये आहे ".
माझ्या डोक्यामध्ये चढलेली पाहुण्यांची नशा एकदम खाडकन उतरली. वाटलं सकाळी पोळी दिलेला कावळा मीठाला जागला. अरे कोण कुठचे लोकं ! त्यांना कधी बघितले पण नाही. काय संबंध त्यांचा ? हूss ड माझ डोकंच फिरलं . मी म्हटले, कसेही करून यातून सुटका करून घेतलीच पाहिजे. पण बायकोचे नातेवाईक म्हणजे जरा जपून घ्यायला हवं.
मला एक नामी युक्ती सुचली. मास्टर प्लॅन तयार केला. 'वाऱ्यावरची वरात' मधल्या पु.लं ना आठवलं.
जेव्हा त्या मंडळींनी आमच्या दाराची बेल वाजवली, तेव्हा मी एक जुना पायजमा व फाटका सदरा घालून दार उघडले. बाहेर एक नवरा-बायको व तीन लहान मुले अशी भली मोठी फौज उभी होती. ते गृहस्थ म्हणाले "शिरीष शिधोरे आहेत का ?" मी म्हणालो "नाही, साहेब अत्ताच अर्जंट कामाकरता बाहेर गेले आहेत. ते आता एकदम पाच वाजता येतील. मी त्यांचा नोकर नारायण. मी पण त्यांच्या कामाच्या फाईल्स घेऊन बाहेर जात आहे " असे म्हणत मी, त्यांनी घरात प्रवेश करायच्या आतच , घराच्या बाहेर पण पडलो आणि कुलूप लावायला लागलो, तेव्हा ते पाहुणे तोंड पाडून बोलले "अरे बापरे ! पमीने आमची निराशा केली. ठीक आहे आता आम्ही समोरच्या बागेत टाईमपास करू. चला रे पोरांनो " तेव्हा त्यांची बायको म्हणते कशी "अहो हे काय? माझी दुपारची "पाहुणे येती घरा" ही मालिका आज बुडणार. शीSS ! आज तर गणू मालतीला मागणी घालणार आहे मालिकेमध्ये ".
मी "सॉरी... सॉरी... " म्हणून कुलूप लावून धूम ठोकली आणि ठरविलं ,की माझा मित्र संदीप कावळे ह्याच्याकडे आपण पाहुणे म्हणून जाऊया. आणि हो सांगायचं राहिलं की मी ज्या पाहुण्यांना घरी चुकवले ,तो पाहुणे प्रकार म्हणजे 'आगंतुक पाहुणे'.
शिरीष शिधोरे
शनिवार , २८ मार्च २०२०
Mast 👍🏻
ReplyDeleteVery nice !!
ReplyDeleteKya bat hai Shirish.
ReplyDeletebahut badia.
मस्त लिहिले आहे सर
ReplyDeleteशिरीष" पाहुणा "विवेचन खूपच छान
DeleteVery nice Shirish...
ReplyDelete